एमपीएससी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना खुशखबर असून राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी म्हणजे ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रमी वेळेत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. आज (१८ जानेवारी २०२४) गुरुवारीच मुख्य परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली. त्याच दिवशी काही तासातच सायंकाळच्या सुमारास अंतिम निकाल जारी करण्यात आला आहे.
राज्यसेवेच्या ६१३ पदांसाठी २०२२ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी फायनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीषक, तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती राबवली गेली. मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आहे. विनायक पाटीलला ६२२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनंजय पाटीलला ६०८ गुण मिळाले. पूजा वंजारी राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. तिला ५७०.२५ गुण मिळाले आहेत.