मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC : सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम

MPSC : सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 09:04 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम आला असून मुलींमध्ये साताऱ्याची शीतल फाळके प्रथम आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील विशाल चौधरी यांनी मिळवला आहे. तर सातारा जिल्ह्यातील शीतल फाळके यांनी महिला प्रवर्गातून अव्वल क्रमांक मिळवला.

आयोगाने नमूद केले आहे की, शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या १०० पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. अंतिम निकालासह प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण (कटऑफ) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्या अर्ज नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या, आरक्षण-प्रमाणपत्राचे दावे प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळल्यास, अर्जातील दाव्यानुसार प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास, अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

IPL_Entry_Point