मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje: शिवसेना कुणाची?; उदयनराजेंनी प्रश्नच निकाली काढला!

Udayanraje: शिवसेना कुणाची?; उदयनराजेंनी प्रश्नच निकाली काढला!

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 12, 2022 02:56 PM IST

Udayanraje On Shivsena: शिंदे गट आणि भाजप यांच्या एकत्र येण्यावरून बोलताना उदयनराजेंनी मविआच्या नेत्यांवर टीका केली.

खासदार उदयनराजेंनी घेतली मंत्री दीपक केसरकर यांची भेट
खासदार उदयनराजेंनी घेतली मंत्री दीपक केसरकर यांची भेट (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Udayanraje On Shivsena: शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे. याबद्दल उदयनराजेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, ""कोणाची म्हणजे काय? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाली आहे तर काय मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. मग माझीच म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रसुद्धा माझाच म्हटला पाहिजे. पण महाराष्ट्र हा लोकांचा आहे, लोकांमधून, जनतेतून आम्ही निवडून येतो. छत्रपतींचा महाराष्ट्र हा जनतेचा आहे." 

राज्याचे कॅबिनेट मंत्री पुण्यात आले असताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांची पुण्यात भेट घेतली. मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट कशासंदर्भात घेतली याचाही खुलासा उदयनराजेंनी केला. ते म्हणाले की, "राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठी ही भेट होती."

शिंदे गट आणि भाजप यांच्या एकत्र येण्यावरून बोलताना उदयनराजेंनी मविआच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले की, "लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवायला कुठली ताकद वापरावी लागत नाही. आता जे एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील अशी मला खात्री आहे. येणारा काळच हे सांगेल. प्रत्येकाला वाटतं की सत्तेत रहावं, पण सत्ता का गेली याचं चितंन केलं असतं तर ही वेळ आली नसती."

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही उदयनराजेंनी भाष्य केलं. “मराठा आरक्षणावर फक्त जाधव, पाटील, भोसले अशा पाट्या लावून फिरतात. तुम्हाला आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस /यांनी प्रयत्न केले. तुम्ही त्यांनाच जातीयवादी म्हणताय. मी जातपात पाहत नाही. शिवाजी महाराजांनीसुद्धा जातपात पाहिली नाही, मग मी कशी बघेन,” असंही उदयनराजे म्हणाले.

IPL_Entry_Point