मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दसऱ्याच्या मुहुर्तावर ठाकरेंचे दोन खासदार अन् ५ आमदार करणार सीमोल्लंघन; शिंदे गटाचा दावा

दसऱ्याच्या मुहुर्तावर ठाकरेंचे दोन खासदार अन् ५ आमदार करणार सीमोल्लंघन; शिंदे गटाचा दावा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 05, 2022 12:05 PM IST

Shivsena VS Shinde: दसरा मेळाव्यातही शिंदे गट ठाकरेंना धक्का देईल असं म्हटलं जात आहे. दोन खासदारांसह ५ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा खासदाराचा दावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - विजय गोहील)

Shivsena VS Shinde: महाराष्ट्रात गेल्या तीन चार महिन्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा महत्त्वाचा असणार आहे. शिवसेनेत बंडखोरीनंतर आज दोन दसरा मेळावे होणार आहे. उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री शिंदे बीकेसी मैदानावर बोलतील. दरम्यान, या दसरा मेळाव्यातही शिंदे गट ठाकरेंना धक्का देईल असं म्हटलं जात आहे. ठाकरे गटातील आणखी दोन खासदार आणि काही आमदार आज शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने हे आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात उपस्थित राहिले होते. तेव्हा बोलताना तुमाने यांनी म्हटलं की, आज दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील. खासदार तुमाने यांच्या दाव्याने आता खळबळ उडाली आहे. बंडखोरीनंतर आतापर्यंत शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर आता आणखी पाच आमदारही गेले तर ठाकरेंना मोठा धक्का बसेल. दुसऱ्या बाजुला दोन खासदारांपैकी एक मुंबईतील तर एक मराठवाड्यातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुमाने यांनी म्हटलं की, एक प्रभावी खासदार शिंदे गटात प्रवेश करू शकतो.

शिवसेनेच्या लोकप्रतिनीधींना याआधीच मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केलाय. हीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी आमची शिवसेना आहे. शिवसेनेला ज्यांनी नेहमी शिव्या दिल्या त्यांच्यासोबत आम्ही गेलो नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दुर्दशेला आम्ही जबाबदार नसल्याचंही तुमाने म्हणाले. राज्यातील ५० आमदार आणि १२ खासदार शिंदे यांच्यासोबत आले आहेत. जनताही शिंदेंसोबत आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जनतेसमोर घेऊन जात असल्याचं खासदार तुमाने यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या