अजित पवार यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्या व यावर भाष्य केलं जातं तसेच त्यांनी निवृत्ती घेण्याविषयी बोललं जातं. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. ८४ व्या वर्षीही शरद पवार जिद्दीने लढत आहेत. त्यांचा एक उज्वल कार्यकाळ आहे. त्यांच्या करिअर ड्राफ्टवर बोलायला मी खूप लहान आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांना बच्चा संबोधणाऱ्या अजित पवार यांचा उल्लेख सुळे यांनी ज्येष्ठ नागरिक असा केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी बारामती अग्रोवर ईडीची कारवाई झाल्यानंतर म्हटलं होतं की, गेल्या १५ दिवसात दिल्लीला कोण गेलं होतं ते तपासा. त्यांना वाटत असेल की, धाडी टाकून मी भाजपसोबत येईन. यावर अजित पवार म्हणाले की, तो अजून‘बच्चा’आहे.तो इतका मोठा झाला नाही,त्याच्याबद्दल मी बोलावं. याबाबत आमचे प्रवक्ते किंवा कार्यकर्ते बोलतील. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादांच्या वयाच्या मानाने रोहित पवार अजून बच्चा आहेच. कारण अजितदादाच आता सिनिअर सिटिझन आहेत. दादा ६५ वर्षांचे आहेत. ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठे आहेत.
भारतात वयाची साठी ओलांडलेल्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात. त्यामुळे अजितदादांनी कधी निवृत्ती घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. तसेच अजित पवारांनी काकाच्या अधिकाराने रोहित पवार यांना बच्चा म्हटले असेल. एक मात्र मी सांगते रोहितच्या वयात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काम करण्याच्या शैलीबाबत म्हणाल तर मीही दिवसाचे १६ तास काम करते तसेच पारदर्शक काम करते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.