मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : '२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती एकनाथ शिंदे व मोदी-शहांमुळे तुटली’, संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut : '२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती एकनाथ शिंदे व मोदी-शहांमुळे तुटली’, संजय राऊतांचा मोठा दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 13, 2023 05:51 PM IST

Sanjay raut on eknath Shinde : २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती तुटली असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay raut on eknath Shinde
Sanjay raut on eknath Shinde

खासदार संजय राऊत यांनी भाजपबरोबरच्या युतीवर भाष्य करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी भाजपबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती तुटली असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेनेमुळे नाही तर मोदी-शाह यांच्यामुळे युती तुटल्याचं म्हणत त्यांनी याचे खापर भाजपवर फोडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संजय राऊत यांनी सांगितले की, दिल्लीत मोदींनी एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांची एक बैठक बोलावली होती. यामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती आम्ही तोडली नाही तर शिवसेनेने तोडल्याचे म्हटलं. मात्र त्यांचे हे विधान असत्य आहे. २०१४ मध्ये भाजपने केवळ एका जागेवरून युती तोडली होती. ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने एकनाथ खडसेंवर सोपवली होती. खडसेंनी याबाबत परवाच स्पष्ट केलं होतं.

त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास भाजपने नकार दिला -

संजय राऊत म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी आणि शहा यांच्या सूचनेवरून युती तुडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे २५ वर्षांची युती त्यांनी तोडून फेकून दिली. २०१९ मध्येही त्यांनीच युती तोडली. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याचे त्यांनी म्हटलं.

भाजपने शिवसेनेस विचारलं की, तुमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? आम्ही शिंदे यांचं नाव घेतलं. कारण ते विधीमंडळाचे नेते होते. पण भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला आणि शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून युती तुटली, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

 

२०१९ मध्ये युती करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यानतंर फडणवीसही म्हणाले होते की, युती, जागा वाटप आणि सत्ता वाटप यावर आमचं एकमत झालं आहे. सत्ता वाटप ५०-५० होईल असं फडणवीस म्हणाले होते. मात्र ही युती होऊ शकली नाही.

WhatsApp channel