नागपूर शहरात झालेल्या 'हिट अँड रन' केस प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालवत असलेल्या भरधाव ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली होती. हा अपघात होण्यापूर्वी संकेत बावनकुळे हा नागपूरच्या प्रसिद्ध लाहोरी बारमध्ये दारु प्यायला होता तसेच येथे ‘बीफ कटलेट’वर ताव मारला होता, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाला दिली. अपघातानंतर नागपूर पोलिसांना संकेत बावनकुळे याच्या अपघातग्रस्त कारमधून बारचे बील सापडले असून त्या बीलमध्ये बीफ कटलेटचा उल्लेख असल्याचं राऊत म्हणाले. पोलिसांनी हे बील जप्त केले आहे. संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी पोलीस या बीलात फेरफार करू शकतात, अशी शक्यता राऊत यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, संकेत बावनकुळे याने नागपूरच्या लाहोरी बारमध्ये ‘बीफ कटलेट’वर ताव मारल्याच्या मुद्दावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टिका केली. बीफ बाळगल्याबद्दल हेच भाजपवाले सर्वसामान्य लोकांचे मॉब लिंचिंग करतात, हल्ले करतात, ट्रेन प्रवाशांना मारहाण करतात. बीफबद्दल भाजपवाले दुसऱ्यांना ज्ञान देतात आणि आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा बारमध्ये जाऊन श्रावण, गणेशोत्सव हे हिंदुंचे सण काहीही न बघता बीफ कटलेट खातो, दारु पितो असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संकेत बावनकुळे याच्यावर कारवाई करण्यास पोलिसांकडून जाणूनबूजून ढिलाई करण्यात येत असल्याबद्दल संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'नागपुरात गृहमंत्र्यांच्या नाकासमोर एक नशेडी तरुण दहा गाड्यांना ठोकून पळून जातो आणि आतापर्यंत एफआयआरमध्ये त्याचे नाव येत नाही. नंबर प्लेटनुसार ती कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मालकीची आहे. त्यांचा मुलगा ही कार चालवत होता. बावनकुळे यांच्या मुलाला वाचवण्यासाठी नंबर प्लेट बदलण्यात आली. एकीकडे मोदी कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलतात. तर दुसरीकडे संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत होते. संकेत बावनकुळे हा कायद्यापेक्षा मोठा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एका निकृष्ट दर्जाच्या व्यक्तिला गृहमंत्री बनवलं असल्याचं संजय राऊत म्हणाले.