Nilesh Lanke Meet Gaja Marane : अहमदनगरचे नवनियुक्त खासदार निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली असून मारणे याने त्यांचा सत्कार केला. दरम्यान, निलेश लंके यांची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेला पार्थ पवार यांनी गजा मारणे याची भेट घेतली होती. त्यावरून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
अहमदनगरचे खासदार नीलेश लंके सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. खासदार झाल्याने ते अनेकांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी लंके हे पुण्यातील अट्टल गुंड गजा मारणे याच्या घरी गेले. लंके यांनी मारणे यांची भेट घेतली. यावेळी गजा मारणे याने लंके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सध्या त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. निलेश लंके हे या व्हीडिओत गजा मारणे याच्या कडून सत्कार स्वीकारताना दिसत आहे. त्यामुळे आता यावरुन राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणे यांची निवडणुकीपूर्वी घरी जाऊन भेट भेटली होती. यावेळी गजा मारणे याने पार्थ यांचा सत्कार देखील केला होता. दरम्यान, पार्थ पवार यांच्या भेटीवरून शरद पवार गटाने अजित पवार यांना कोंडीत पकडले होते. त्यांच्यावर टीका देखील केली होती. अजित पवार हे गुंडांना अभय देत असल्याची अनेकांनी टीका देखील केली होती. मात्र, आता शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी गजा मारणे यांची भेट घेऊन सत्कार स्वीकारल्याने त्यांच्यावर आता टीका केली जाणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी गजा मारणे आणि नीलेश लंके यांच्या भेटीवर टीका केली आहे. मिटकरी यांनी शेरो शायरी करत ही टीका केली आहे. हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता, असे म्हणत त्यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. तुतारी गटाचे शालीन वक्ते आता कुठे लपले आहे असे मिटकरी यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली होती तेव्हा गदारोळ माजवला होता. आजित पवारांनी चूक झाल्याचं त्यावेळी मान्य केले होते. आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.