मध्य प्रदेशात मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडियावर लाऊडस्पीकरवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत लिहिले की, यामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. धार्मिक संघटनांनी या महिला अधिकाऱ्याविरोधात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने म्हटले आहे की, या अधिकाऱ्याने उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.
गेल्या आठवड्यात भोपाळमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पब्लिक अॅड्रेस सिस्टीममधून (लाऊडस्पीकर) होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरून वाद निर्माण झाला होता. डीजेच्या तालावर नाचणारा हा मुलगा अचानक बेशुद्ध पडला आणि शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे लाऊडस्पीकरबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
एका पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मशिदींमध्ये पब्लिक अॅड्रेस सिस्टीमचा वापर आणि या जागांबाहेर डीजे वाजविण्याचे प्रमाण यावर लक्ष केंद्रित करत कायद्यातील विषमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन म्हणाल्या की, मंदिरांमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होते. रात्री उशीरापर्यंत याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येतो. त्याकडे अनेकदा दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही उपस्थित केला आहे.
मात्र, 'संस्कृती बचाव मंच' या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर तिवारी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याने केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. या अधिकाऱ्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अब्बास हफीज म्हणाले की, आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. लाऊड स्पीकरविरोधात भाजप सरकारच्या पक्षपाती कारवाईवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संबंधित बातम्या