मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवनीत राणा येत्या ६ महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

नवनीत राणा येत्या ६ महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 06, 2024 06:13 PM IST

Prakash Ambedkar on Navneet Rana : पुढील सहा महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये दिसतील. त्यांच्या मुलूंड कोर्टात घिरट्या सुरू आहेत, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Prakash Ambedkar on Navneet Rana
Prakash Ambedkar on Navneet Rana

वंचित बहुजन आघाडीला अजूनपर्यंत महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’ मध्‍ये आमंत्रित करण्‍यात आलेले नाही. वंचितची काँग्रेस किंवा राष्‍ट्रवादी शरद पवार गटासोबत कोणतीही बोलणी झालेली नाही. आम्ही केवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांचे ठरलेले नाही, असं स्पष्टीकरण देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत सर्वात मोठा दावा केला आहे.

नवनीत राणा मुलुंड कोर्टात हेलपाटे मारत आहेत. तसेच येत्या ६ महिन्यांत त्या जेलमध्ये दिसतील, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. त्याचबरोबर नवनीत राणा भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असताना व त्यांची तशी तयारी असताना प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. आमदार रवी राणा यांच्याबाबत प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत हा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला. म्हणूनच रवी राणाची मिसेस कोर्टात घिरट्या घालत आहेत, सहा महिन्यांमध्ये ती जेलमध्ये दिसेल, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात नवनीत राणांना जेल होणार असल्याचे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.

..त्यानंतरच शिवसेना व वंचितमध्ये जागावाटपाची चर्चा - आंबेडकर

महाआघाडीत समावेशाबाबत प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, अशी आमची इच्‍छा आहे. आमची भूमिका आहे की, भाजपला सत्‍तेपासून दूर ठेवण्‍यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. याबाबत वंचितने काँग्रेसला पत्रही पाठवले आहे. मात्र काँग्रेसकडून त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

आमची युती शिवसेनेसोबत असल्‍याने शिवसेनेने महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत परस्‍पर चर्चा करावी, असे आम्‍ही ठरवले आहे. आधी या तीन पक्षांनी आपापसात जागावाटप करावे, नंतर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्‍ये जागा वाटपाची चर्चा होऊ शकेल, असे आंबेडकर यांनी सांगितले.

WhatsApp channel