Mumbai Trans Harbour Link traffic rules : भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणाऱ्या तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू (Atal Setu) म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पुलावर दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षाला प्रवासास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करतांना १०० किमी प्रतितास वेग मर्यादेचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. हा पूल सहा पदरी असून १६.५०किलोमीटर मार्ग समुद्रातून तर ५.५ किलोमीटरचा भाग हा जमिनीवर आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या MTHL चे उद्घाटन १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रशस्त मार्ग मुंबईच्या प्रवसात आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. या पूलावरून प्रवास करतांना कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहने, मिनीबस आणि टू-एक्सल बसेसची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ताशी १०० किलोमीटर वेगाने त्यांना प्रवास करता येणार आहे. तर पुलावर चढताना आणि उतरताना वेग ४० किमी प्रतितास इतका मर्यादित असेल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या पुलावर अपघात टाळण्यासाठी भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.
तब्बल १८ हजार कोटी खर्चून हा सागरी सेतू उभारण्यात आला आहे. हा पूलाची सुरुवात ही मुंबईतील शिवडी येथून सुरू होते. तर या पूलाचा शेवट हा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे होतो.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मल्टी-एक्सल अवजड वाहने, ट्रक आणि बसेसना ईस्टर्न फ्रीवेवर प्रवेश मिळणार नाही असे देखील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाहनांना मुंबई पोर्ट-शिवरी एक्झिट (एक्झिट 1C) मार्ग वापरावा लागणार आहे. पुढील वाहतुकीसाठी 'गाडी अड्डा'जवळील एमबीपीटी रोडला जावे लागणार आहे.
मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर, जनावरे ओढणारी वाहने आणि संथ गतीने चालणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. या पुळवरून वाहनचालक मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त २० मिनिटांत पूर्ण करू शकणार आहे. या पूर्वी हे अंतर कापण्यासाठी तब्बल २ तास लागत होते.