mother of 2 children climbed on water tank : प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट शोलेमध्ये अभिनेता धर्मेद्रच्या म्हणजेच विरूच्या आणि बसंतीच्या लग्नाला नकार दिल्याने तो गावातील पाण्याच्या टाकीवर चढून चित्रपटातील अभिनेत्री हेमा मालिनी म्हणजेच बसंती हिच्याशी लग्नाची मागणी करतो. असाच प्रसंग आज मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अनुभवायला आला. मात्र, यात बसंती ही टॉवरवर चढून तिने प्रियकरासोबत लग्नाची मागणी करत खाली उतरण्यास नकार दिला. शिवपुरी येथील विवाहित महिलेला आपल्या प्रियकरासोबत राहायचे होते. मात्र, घरच्याचा विरोध असल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी ही महिला येथील पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढली.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, ही महिला दोन मुलांची आई आहे. तिला तिच्या प्रियकरासह राहायचे होते. मात्र, घरच्यांनी विरोध केल्याने तिने येथील नरवार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पान घाटा पॉवर हाऊसजवळील पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढली. ही घटना ग्रामस्थ आणि पोलिसांच्या लक्षात आल्यावर तिला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थ तिची मनधरणी करत होते. मात्र, जो पर्यंत तिच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत महिलेने खाली येण्यास नकार दिला. एवढेच नाही तर तिने तिच्या प्रियकराला घटनास्थळी बोलावण्याचा आग्रह देखील धरला.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॉवरवरील महिला जितेंद्र नावाच्या व्यक्तीला सतत फोन करत होती. तेथे उपस्थित असलेले पोलिसही महिलेला टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती करत होते. महिलेच्या जिद्दीमुळे खबरदारी म्हणून एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. परिस्थिती पाहता टॉवरखाली चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
ही महिला सकाळी ७.३० च्या सुमारास पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढली होती. बराच वेळ समजूत घातल्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास ती टॉवरवरून खाली उतरली. महिलेला सुखरूप खाली उतरवल्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.