Nagpur Accident : वाढदिवस साजरा करून घरी परतताना रिक्षाला अपघात; माय-लेकाचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Accident : वाढदिवस साजरा करून घरी परतताना रिक्षाला अपघात; माय-लेकाचा जागीच मृत्यू

Nagpur Accident : वाढदिवस साजरा करून घरी परतताना रिक्षाला अपघात; माय-लेकाचा जागीच मृत्यू

Dec 28, 2024 01:02 PM IST

Nagpur Auto Rickshaw Accident: नागपुरातील एमआयडीसी परिसरात रिक्षा अपघातात माय- लेकाचा मृत्यू झाला आहे.

वाढदिवस साजरा करुन घरी परतताना रिक्षाला अपघात
वाढदिवस साजरा करुन घरी परतताना रिक्षाला अपघात

Nagpur Accident News: नागपुरातील एमआयडीसी परिसरात रिक्षाला भीषण अपघात झाला. या अपघातात माय- लेकांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करून घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.रिक्षा चालकाने नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करुणा गोपाल साखरे (वय, ४९) आणि रोहित साखरे (वय, २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या माय- लेकांची नावे आहेत. करुणा त्यांचा मुलगा रोहित याच्यासोबत चुलत बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना एमआयडीसी- वाडी मार्गावरील प्लास्टो कंपनीजनवळ त्यांची रिक्षा दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, करुणा आणि त्यांचा मुलगा रोहितचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला.

करुणा या अंगणवाडी सेविका होत्या. तर, रोहित हा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. रोहितचा धाकटा भाऊ रिक्षाचालक आहे. परंतु, तो परगावी गेल्याने रोहित स्वत:रिक्षा चालवून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला. रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे साखरे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

देशात गेल्या वर्षी जवळपास २ लाख लोकांचा अपघाती मृत्यू

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.

देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक?

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर