Satara Accident : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी येथे सेवा रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील क्रेनचालकाने भरधाव वेगात क्रेनचालवत वाहनांना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या माय लेकीला क्रेनचालकाने धडक दिल्याने दोघींचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर तनावाचे वातावरण तयार झाले होते. ग्रामस्थांनी तब्बल १ तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, फरार होण्याऱ्या क्रेनचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुक्मिणी परदेशी (वय ३५), गायत्री परदेशी (१८, रा. कन्हाड), अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकीची नावे आहेत. तर आर्या परदेशी (१३), असे जखमी मुलीचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडला. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा ते कऱ्हाड बाजूकडे जाणाऱ्या कोर्टी गावच्या सेवा रस्त्यावर रविवारी रात्री एका क्रेनचालकाने दारूच्या नशेत भरधाव वेगात आणि हयगय करत क्रेनचालवली. यावेळी सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनांना या क्रेनने जोरदार धडक दिली. क्रेनने एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर समोर चाललेल्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींच्या अंगावरून क्रेन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात भीषण होता. येथील सेवा रस्त्याचा कठडा क्रेनमुळे तुटला. घटनेनंतर मद्यधुंद क्रेनचालक हा फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी परदेशी या त्यांच्या दोन मुलींसह तारळे (ता. पाटण) येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्या कन्हाड येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. क्रेनच्या धडकेमुळे त्या त्यांच्या मुलींसह खाली पडल्या. यावेळी क्रेन अंगावरून केल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.