मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde : ‘सर्वाधिक आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपद; मग सरकार आणून फायदा काय?’

Dhananjay Munde : ‘सर्वाधिक आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपद; मग सरकार आणून फायदा काय?’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 17, 2022 03:03 PM IST

Dhananjay Munde on BJP : आमचं सरकार शिस्तीचं होतं, परंतु हे सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt
Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt (HT)

Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt : राज्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमावरून शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी भाजपला डिवचलं आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजेच १२० आमदार असतानाही देवेंद्र फडणवीसांना केवळ उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं, मग राज्यात नवं सरकार स्थापन करून भाजपला काय फायदा झाला?, असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केली आहे. बीडमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणाले की, अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना बीड जिल्ह्याला मुबलक प्रमाणात निधी मिळाला. आमच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही राज्यात भरीव काम करण्याचा प्रयत्न केला, आमचं सरकार शिस्तीचं होतं, हे शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्त असल्यासारखं वागत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नसतं, यांनी हे मिळवलं नाही तर गमावलंय. परंतु या सत्तांतराच्या काळात भलेही सत्ता कुणाचीही येवो, परंतु कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्यात असंख्य संकटं असतानादेखील अजित पवारांनी जिल्ह्याला कोणताही निधी कमी पडू दिला नाही, याचा मला अभिमान वाटतो, असं मुंडे म्हणाले.

दरम्यान अजित पवारांनी बीडमधील सभेत बोलताना बेरोजगारी आणि वेदांता प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel