Ganesh Chaturthi 2024: आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवसापासून सलग दहा दिवस गणेश उत्सवाला सुरुवात होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात प्रचंड गर्दी केली.
दरम्यान, ढोल ताशा, फटाके, अगदी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वजण स्वागत करतात. सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. तसेच लाडक्या बाप्पाची आज घरोघरी मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे दिसत आहे.
भगवान गणेशाचा जन्म मध्यकालात झाला होता. त्यामुळे गणेश पूजेसाठी मध्यकाळ खूप चांगला मानला जातो. यावर्षी मध्यम गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ३ मिनिटांपासून दुपारी ०१ वाजून ३४ मिनिटांपर्यंत सुमारे २ तास ३१ मिनिटे चालणार आहे. यावेळी पवित्र स्थळावरून घेतलेल्या मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीची विधीसह प्रतिष्ठापना करावी. चंदन व रोळीने पूजा करावी, एक दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
गणेशमूर्ती, कुंकू, दूर्वा, अक्षत, लाल कपडे, माऊली, रोली, लवंग, वेलची, सुपारी, पान, पंचमेव, सिंदूर, जनेऊ जोडा, गायीचे तूप, साखर, फळे, गंगाजल, फुलांची माळ, गुलाबजल, परफ्यूम, अगरबत्ती, नाणे, नारळ, मध, दही, गुलाल, अष्टगंधा, हळद, गायीचे दूध, मोदक, गूळ, कलश, धूप-दीप यासह सर्व पूजा साहित्य गोळा करा.
सर्व प्रथम सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातील ज्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती बसवायची आहे, ती जागा स्वच्छ करून आसनावर बसून गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प घ्यावा. यानंतर बाप्पाची आराधना करावी. यानंतर हातात गंगाजल, फुले आणि कुश घेऊन श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा आणि गणेशाला धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत, म्हणून त्याला मोदक, दुर्वा, केळी, मोतीचूर लाडू अर्पण करा.