कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या शिवनाकवाडी या गावात महाप्रसादाची खीर खाल्ल्याने जवळपास ३०० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना इचलकरंजीतील व शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावचे ग्रामदैवत कल्याणताई माता देवीची सोमवारी यात्रा होती. या यात्रेसाठी महाप्रसाद बनवला होता. या महाप्रसादाच्या खिरीतून भाविकांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच १००० हून अधिक जणांची तपासणी करून प्राथमिक उपचार देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.
५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिवनाकवाडी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. त्यामुळे परिस्थिती बुधवार दुपारपासून आटोक्यात आली असल्याचे डॉ. खटावकर यांनी सांगितले.
शिवनाकवाडी गावचे ग्रामदैवत कल्याणताई देवीच्या यात्रेसाठी शिवनाकवाडी शिरदवाड यासह जिल्ह्यातून भाविक गावात दाखल झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीपासून गावातील अनेक नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातील नागरिकांनी गावातील खासगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. बुधवारी पहाटेपर्यंत गावातील तीनशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
गावात यात्रेच्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थ आणि पाण्यामधून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनास्थळी दाखल होऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या सुमारे ५० जणांवर शिरोळ येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिवनाकवाडी येथे मंगळवारी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथे प्रसाद म्हणून खीर दिली जात होती. बुधवारी सकाळपासून लोकांना जुलाब, चक्कर येणे, ताप येणे अशा तक्रारी सुरू झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जत्रेत खीर खाल्ल्याचा बहुतांश लोकांचा दावा आहे. मात्र, जत्रेत इतरही अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. जत्रेतून गोळा करण्यात आलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. ही खीर खरोखरच विषारी होती की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संबंधित बातम्या