मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आरे कारशेडवरील स्थगिती हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

आरे कारशेडवरील स्थगिती हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 21, 2022 02:32 PM IST

Aarey Metro Car Shed : महाविकास आघाडी सरकारकडून आरे मेट्रो कारशेड देण्यात आलेली स्थगिती हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळं आता आरे कारशेडच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde On Aarey Metro Car Shed
CM Eknath Shinde On Aarey Metro Car Shed (HT)

CM Eknath Shinde On Aarey Metro Car Shed : आरे कारशेडच्या कामाला देण्यात आलेली स्थगिती हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळं आता मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं आरे कारशेडच्या कामावर बंदी आणली होती, या निर्णयला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. त्यामुळं आता आरे मेट्रो कारशेडचं काम सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु भाजप सरकार गेल्यानंतर आरेतील नागरिक आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळं तात्कालीन ठाकरे सरकारनं या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मेट्रो ३ चं कारशेड हे आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता शिंदेंनी आरे कारशेड प्रकल्पावरील बंदी उठवली आहे.

मुंबईतील मेट्रो ३ चा प्रकल्प शहराच्या मुख्य मार्गातून आणि मुख्य भागातून जाणार असल्यानं हा प्रकल्प मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. भाजपसोबत सत्तेत असतानाही त्यावेळी शिवसेनेनं पुन्हा सत्तेत आल्यास या प्रकल्पाला ब्रेक देण्याची घोषणा केली होती. त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आश्विनी भिडे यांची पुन्हा नियुक्ती...

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोचा कार्यभार प्रशासकीय अधिकारी आश्विनी भिडे यांच्याकडून काढून घेतला होता. परंतु शिंदे सरकार आल्याच्या काही दिवसांतच भिडे यांना पुन्हा मेट्रो ३ प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या