मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांना खुशखबर.. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या मान्सूनने पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली
पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली
पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली

मुंबईकरांना खुशखबर.. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या मान्सूनने पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली

25 October 2022, 23:14 ISTShrikant Ashok Londhe

दरवर्षी सप्टेंबरअखेर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रेंगाळलेल्या पावसाने राज्यातील जवळपास सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

मुंबई – यंदा मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दरवर्षीपेक्षा यंदा पावसाळा जवळपास महिनाभर लांबला होता. दरवर्षी सप्टेंबरअखेर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रेंगाळलेल्या पावसाने राज्यातील जवळपास सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ऑक्टोबर अखेरीस सात मोठ्या धरणात मिळून सरासरी ९७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमध्ये सध्या ९७.३१ टक्के पाणीसाठा आहे. सातही धरणात मिळून सध्या १४ लाख ८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. या वेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही. यंदा पाऊस चांगलाच लांबल्यामुळे ऑक्टोबर महिना संपत आला तरी धरणे काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.

राज्यातून मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा हवामान विभागाने सोमवारी केली. दरवर्षी साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा संपलेला असतो. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून पाण्याचे नियोजन केले जाते. पुढीलवर्षी जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन केले जाते. यंदा मात्र पाणीसाठ्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत धरणक्षेत्रात यंदा जास्त पाऊस पडला आहे.