मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची वट, …आता नुसती फरफट”, मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसला कोपरखळी

“तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची वट, …आता नुसती फरफट”, मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसला कोपरखळी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 25, 2022 05:57 PM IST

एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच विधानसभेत कविता सादर करून काँग्रेसवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसला कोपरखळी
मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसला कोपरखळी

Maharashtra assembly session :  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस आहे. मागील चार पाच दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. आज विधानसभेत केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच विधानसभेत कविता सादर करून काँग्रेसवर निशाणा साधला. 

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा उल्लेख करत म्हटले की, नाना पटोले आता उपस्थितीत नाहीत मात्र बाळासाहेब थोरात आहेत. मात्र काय परिस्थिती झालीये काँग्रेसची? काँग्रेसची बिचाऱ्यांची आधीही समस्या होतीच. आधी बाळासाहेब थोरात माझ्याकडे बोलायचे की हे सगळं काय चाललंय. मी त्यांना बोलायचो की माझ्या हातात सगळं नाहीये ना. माझ्या हातात सगळं असतं तर मी केलं असतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी एका कवितेच्या माध्यमातून काँग्रेसला चिमटा काढला. मुख्यमंत्री म्हणाले…

आता काँग्रेसची स्थिती पाहून येते दया..
महाविकास आघाडीची पुरती गेली रया..
दादा आणि अंबादास बसले..
काँग्रेसवाले हात चोळत बसले
तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची एकेकाळी होती वट
टोमणे सेनेबरोबर आता झाली नुसती फरफट…

मुख्यमंत्र्यांनी कविता संपवताच सभागृहात हशा पिकला. विरोधी बाकांवर बसलेल्या आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या कवितेला मनमोकळेपणे हसून दाद दिली. तसेच अजित पवार व अंबादास यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवताना यांनी काँग्रेसला विचारलंच नाही, असे मुख्यमंत्री म्हणताच ही महाविकास आघाडीतील अंतर्गत बाब असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

IPL_Entry_Point