Monsoon arrival in kerala : देशातील अनेक शहरांचे तापमान ५० डिग्री पार झाले आहे. वाढता उकाडा व तापमानामुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांमध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून (Monsoon 2024) केरळच्या किनारपट्टीला धडकणार आहे. हवामान विभागाने मान्सूनबाबत ही महत्वाची अपडेट दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ६ जून रोजी होणार असल्याची शक्यता आहे.
दिल्ली, यूपी, राजस्थान आणि बिहारसह देशातील अनेक राज्यात तापमानाने कहर केला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाने ५० डिग्री सेल्सियसचा आकडा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून गुड न्यूज मिळाली आहे. हवामान विभागाने सांगितले की, येत्या २४ तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात दक्षिण भारतातील राज्यांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे तर येत्या काही आठवड्यात मान्सून मध्य व उत्तर भारतात सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने सांगितले की, मान्सून केरळ किनारपट्टीकडे सरकत आहे. केरळनंतर मान्सून ईशान्येकडील राज्यांकडे सरकेल.
इतकेच नाही तर हवामान विभागाने लू चा सामना करत असलेल्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. हवामान विभागाने म्हटले की, ३० मे नंतर उष्णतेची लाट कमी होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एक आठवड्यात काही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर सिक्किम आणि बंगालमध्येही हवामानात बदल होईल. गुरुवारीपासून वातावरणात बदल होऊन येत्या ५ दिवसात पाऊस सुरू होऊ शकतो.
३१ मे ते २ जून दरम्यान गंगा नदीच्या किनारपट्टीवर बंगाल, झारखंड, बिहार तसेच ओडिशामध्ये पाऊस होईल. या राज्यात काही ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही हवामान बदलणार आहे.
सध्या दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि यूपीसह देशातील अनेक राज्यांचे तापमान ५० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीत मंगळवारी तीन स्थानांवर कमाल तापमान ४९ डिग्री सेल्सियसहून अधिक नोंदवले गेले.
संबंधित बातम्या