मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत, मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन ११ जूनच्या सुमारास होत असते. मात्र यंदा दोन दिवस आधीच मान्सून पुढे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
आयएमडीने ९ आणि १० जून रोजी दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सूनची उत्तर सीमा आता ठाणे, अहमदनगर, बीड, निजामाबाद, सुकमा, मलकानगिरी, विजयनगर आणि इस्लामपूर मार्गे जात आहे.
पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाला आहे. अरबी समुद्राच्या शाखेमुळे किनारपट्टी महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर चांगला पाऊस पडत आहे. मात्र, बंगालच्या उपसागराची शाखा तितकीशी सक्रिय नव्हती. १३ ते १४ जून दरम्यान पावसाचा जोर वाढेल आणि उर्वरित पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड आणि बिहारचा भाग व्यापण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनची वाटचाल सुरळीत सुरू आहे, असे स्कायमेट वेदरचेउपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.
९ आणि १० जून रोजी दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टी कर्नाटक आणि ९ ते ११ जून दरम्यान उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला आहे. तसेच या भागांसाठी रेड कॅटेगरीइशारा जारी केला आहे, ज्याचा अर्थ असा आहे की अचानक पूर किंवा मुसळधार पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे.
वायव्य भारतात सोमवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस पूर्व भारत आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील तुरळक भागात शनिवारी उष्णतेची लाट होती. पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते; उत्तर मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात; शनिवारी हरियाणा, दिल्ली, बिहार आणि गुजरातच्या तुरळक भागात. या भागात तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक होते.
प्रयागराज (पूर्व उत्तर प्रदेश) येथे सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; आसाम आणि मेघालय, उपहिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर शनिवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
९ ते १३ जून दरम्यान पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालच्या तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये ११ ते १३ जून दरम्यान तर ओडिशामध्ये ११ आणि १२ जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
संबंधित बातम्या