ladki bahin yojana Fraud: लाडकी बहीण योजनेत अनेक फ्रॉड उघडकीस येत आहेत. सातारा, कोल्हापूरनंतर, संभाजी नगरनंतर आता नांदेड येथे या योजनेअंतर्गत लाडक्या भावाने बहिणींचे पैसे लाटल्याचा प्रकार पुढे आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मनाठा, (ता. हदगाव) येथील एका सीएससी केंद्र चालकाने रोजगार हमी योजनेच्या नावाखाली गावातील पुरूषांचे आधार कार्ड जमा करत या योजनेत अर्ज भारत लाखो रुपयांची फसवणूक करून गावातून पसार झाला आहे. यात गावातील महिलांबरोबर पुरुषांची फसवणूक देखील या सीएससी चालकाने केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार सीएससी चालकाचा शोध घेत आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनठा येथे हा प्रकार घडला. यतहिल सचिन सीएससी सेंटर चालकाने हा गैरप्रकार केला. सीएससी चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले असे गावातील पुरुषांना सांगितले. त्यानंतर पैसे बँकेत जमा होण्यासाठी गावातील ओळखीच्या नागरिकांकडून आधार कार्ड, बँक पासबुक या सारखी महत्वाची कागद पत्र गोळा केली. यानंतर लाडकी बहीण योजने अंतर्गत गावातील महिलांचे अर्ज भरतांना गावातील जमा केलेले पुरूषांचे आधार क्रमांक टाकले. या सोबतच त्यांचा खाते क्रमांक देखील दिला. या योजनेचे पैसे जेव्हा खात्यात जमा झाले. तेव्हा रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचे सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम आरोपीने उचलली.
गावातील अलीम सलीम कादरी या व्यक्तीच्या मोबाइल फोनवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर अलीम कादरी यांनी लगेच सेंटर चालकाला या बाबत विचारपूस केली. यावेळी सेंटर चालकाने कोणाला सांगू नको, काही होत नाही, असे म्हणत उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच तुमचे कागद पत्रे परत करतो म्हणत सेंटरला कुलूप लावून आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, या नंतर आपली फसवणूक झल्याचे गावातील नागरिकांच्या नागरिकांच्या लक्षात आहे. आरोपीने मनाठा येथील ३८ तर बामणी फाटा येथील ३३ पुरूषांचे आधार क्रमांक वापरून तब्बल ३ लाख १९ हजार ५०० रुपये परस्पर उचलून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. कोणत्याही योजनेची अशा प्रकारे रक्कम लाटणे हा गुन्हा आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांची नावे आरोपीने कशी घातली? यात आणखी कुणाचा समावेश आहे का ? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.