मोदी-शहांनी शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबवले; निवडणुकीत जो पाडू शकेल त्याला शेतकऱ्यांनी मत द्या: शेतकरी नेत्याचे आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोदी-शहांनी शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबवले; निवडणुकीत जो पाडू शकेल त्याला शेतकऱ्यांनी मत द्या: शेतकरी नेत्याचे आवाहन

मोदी-शहांनी शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबवले; निवडणुकीत जो पाडू शकेल त्याला शेतकऱ्यांनी मत द्या: शेतकरी नेत्याचे आवाहन

Nov 05, 2024 07:41 PM IST

केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप शेतकरी नेते, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केला आहे.

शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबविल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्याः अमर हबीब
शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबविल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्याः अमर हबीब

मोदी-शहा यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत, उलट ते अत्यंत क्रूरपणे राबविले. परिणामी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप शेतकरी नेते, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केला आहे. जीएसटी कायद्याने शेतकऱ्यांची लूट केली. आयातीच्या धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हिंदू-मुस्लिम जातीयवाद असे द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यामुळे पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे हबीब म्हणाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुणाला मत द्यायचे हे ठरवण्यापेक्षा कुणाला पाडायचे हेच माझ्या हातात आहे. म्हणून मी कोणाला मत द्यायचे नाही, एवढेच ठरवू शकतो, असं हबीब म्हणाले. 

अमर हबीब पुढे म्हणाले, ‘१९९०च्या विधानसभा निवडणुकीत शरद जोशी यांनी जातीयवादी गिधाडे म्हणत भाजप युतीच्या सरकारच्या विरोधात आघाडी उभी केली होती. आज शेतकरी आघाडी उभी करू शकत नसला तरी मतदानातून आपला कौल देऊ शकतो. त्याच भूमिकेशी सुसंगत राहून मी माझी भूमिका ठरवली आहे.’ असं हबीब म्हणाले. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोणताही पक्ष किंवा संघटना किंवा मुद्दा न पाहता निवडणुकीत कुणाला पाडायचे आहे यावर लक्ष केंद्रित करावे, असं हबीब म्हणाले. त्यामुळे जो कोणी पाडू शकेल त्याला मत दिले पाहिजे, असे माझे मत आहे. अनेक जण सत्ताधारी पक्षाकडून सुपारी घेऊन उभे आहेत. त्यांचा हेतू फक्त मतविभाजन करायचा आहे. त्यांच्या नेत्यांनी घडवून खेळ केला आहे. या नेत्यांनी विधानसभेत वा लोकसभेत असताना एकदाही शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) कायद्यांच्या विरुद्ध एक शब्द देखील उच्चारला नाही. त्यापैकी काहींना सत्तेची चटक लागली आहे, काहींना सौदेबाजी करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मोदी-शहाच्या उमेदवाराला विजयी करण्यात हातभार लागेल असे काही करणे उचित ठरणार नाही. तसेच सरकार पाडू शकतो, असा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास निर्माण होण्यात अडथळा येता कामा नये, असं हबीब म्हणाले. 

शरद जोशी यांच्या सुरू शेतकरी संघटनेत अमर हबीब यांनी १९८०च्या दशकापासून काम केले. पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शरद जोशी यांनी हबीब यांना दिली होती. अमर हबीब यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भव्य 'ज्वारी परिषद' आयोजित केली होती. अमर हबीब यांनी लिहिलेले ‘शेतकरीविरोधी कायदे’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. ती महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या होती. हबीब यांच्या नेतृत्वाखाली ‘किसानपुत्र आंदोलना’च्या माध्यमातून दरवर्षी १९ मार्च रोजी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एक दिवसाचा अन्नत्याग करत असतात.

Whats_app_banner