मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन, बड्या नेत्याचं धक्कादायक विधान
Nana Patole Criticised Modi Government: आगामी विशेष अधिवेशावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Nana Patole On Parliament Special Session: संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या आठवड्यापासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरुवात होणार आहे.मात्र, अद्याप अधिवेशनाचा कोणताही अजेंडा जाहीर करण्यात आला नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विरोधी पक्ष आणि संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता हे अधिवेशन बोलावले आहे. कोरोना संकट, नोटाबंदी, मणिपूर हिंसाचार या काळात अशी कोणतीही विशेष सत्रे बोलावली गेली नाहीत, मग आता का?” असाही प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. तसेच “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या मोदी सरकारची योजना आहे. यासाठीच हे अधिवेशन बोलवण्यात आले आहे”, असाही त्यांनी आरोप केला आहे.
पुढे नाना पटोले म्हणाले की, “मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची शान आहे. भाजप गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई शहराचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारने ग्लोबल फायनान्शियल सेंटर गुजरातला पळवले. हिरे उद्योग तिथे नेला. एअर इंडियाचे मुख्यालयही तिकडेच हलवण्यात आले.आता मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा मोठ्या कटाचा भाग म्हणून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज गुजरातला स्थलांतर करण्याची योजना मोदी सरकार बनवत आहे.”
येत्या १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर झाली नाही. दरम्यान, हे अधिवेशन १७व्या लोकसभेचे तेरावे आणि अखेरचे अधिवेशन ठरणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.