नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासात मंत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींनी गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार तसेच संरक्षण मंत्रालय भाजपकडेच ठेवत मागील कॅबिनेटमधील मंत्रीच या विभागात कायम ठेवले आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते व परिवहन मंत्रालय कायम ठेवले आहे. अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्य मंत्री असतील.
मोदी ३.० मध्ये अनेक जुन्या मंत्र्यांना पुन्हा तीच खाती देण्यात आली आहेत. राजनाथ सिंह पुन्हा संरक्षण मंत्री बनले आहेत तर अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य खातं दिलं आहे.
रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे युवक कल्याण व क्रीडा खात्याची जबाबदारी दिली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा खासदार बनले आणि त्यांना थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या सहकार खात्याची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री अमित शाह आहेत.
दरम्यान, एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात एकूण कॅबिनेट मंत्र्यांपैकी २५ भाजपाचे आणि ५ इतर घटक पक्षांचे आहेत. तर स्वतंत्र प्रभार असणारे ५ राज्यमंत्री आहेत. ज्यात ३ भाजपचे आहेत. आरएलडीचे जयंत चौधरी यांच्याकडे एक तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे एक आहे.