मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NDA govt Cabinet : अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं का नाकारलं मोदींनी देऊ केलेलं राज्यमंत्रिपद? 'हे' आहे कारण

NDA govt Cabinet : अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं का नाकारलं मोदींनी देऊ केलेलं राज्यमंत्रिपद? 'हे' आहे कारण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 10, 2024 02:10 PM IST

Modi 3.0 Cabinet : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एनडीएच्या नव्या सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला. याचे करण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एनडीएच्या नव्या सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला. याचे करण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एनडीएच्या नव्या सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला. याचे करण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. (Nitin Lawate)

Why did NCP leader Praful Patel reject BJP's MoS offer : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नव्या सरकारमध्ये पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री पद देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावला आहे. प्रफुल पटेल यांना कॅबिनेट पद मिळावे यासाठी वाट पाहण्याची देखील पक्षाची तयारी आहे. या बाबत रविवारी अजित पवार व सुनील तटकरे यांनी घोषणा केली. लवकरच राज्यसभेमध्ये पक्षाचे आणखी दोन खासदार निवडून येतील, त्यानंतर पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ट्रेंडिंग न्यूज

Vikhroli News:डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू; व्रिकोळीतील घटना

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा रविवारी शपथविधी झाला, या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे खासदार नितीन गडकरी, पियुष गोयल (कॅबिनेट मंत्री), रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ (राज्यमंत्री); आरपीआय (अ) चे अध्यक्ष रामदास आठवले (स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री) आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.

महाराष्ट्रात सत्ता असलेल्या महायुतीत राष्ट्रवादी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर राज्यमंत्री पद नाकारले असल्याची माहिती दिली.

 राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचा राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव का फेटाळला ?

पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपद स्वीकारणे म्हणजे 'डिमोशन' ठरेल, असे मत व्यक्त केले. प्रफुल पटेल म्हणाले, शनिवारी रात्री राष्ट्रवादीला स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री पदाची ऑफर भाजपने दिली. मी आधी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतो, त्यामुळे माझ्यासाठी हे पद स्वीकारने म्हणजे डिमोशन असेल. त्यामुळे हे पद घेण्यास नकार दिला. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार स्वीकारने आम्हाला योग्य वाटले नाही, असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटले आहे.

प्रफुल पटेल म्हणाले, आज राष्ट्रवादीकडे एक लोकसभा आणि एक राज्यसभेचा खासदार आहे. पण येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यसभेत आमचे एकूण तीन सदस्य होतील आणि संसदेत आमच्या खासदारांची संख्या चार होईल. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाची एक जागा देण्यात यावी, असे आम्ही म्हटले आहे.

दरम्यान, काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठीक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकारांसमोर निर्णयाची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सहभागाबाबत 'एनडीए'तील सर्व घटक पक्षांशी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथसिंह आणि अमित शहा यांनी चर्चा केली होती. त्याबाबत अजित पवार यांनी सांगितले, “लोकसभा आणि राज्यसभा मिळून पक्षाचे दोन खासदार आहेत. दोन-तीन महिन्यांत राज्यसभेच्या आणखी दोन जागा वाढतील. त्यामुळे मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाची एक जागा मिळावी, अशी मागणी केली. मंत्रिमंडळ विस्तारात प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळावे, यासाठी थांबण्याची तयारी आहे." 'एनडीए' मध्ये असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारांनीच काम करणार, असेही पवार म्हणाले.

Schools Uniforms: राज्य सरकार विद्यार्थ्यांना फक्त एकच गणवेश देणार, दुसऱ्याचं काय?

भाजपने काय प्रतिक्रिया दिली?

युती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काही निकष निश्चित केले जातात आणि ते निकष एका पक्षासाठी बदलता येत नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीला आम्ही स्वतंत्र प्रभार (राज्यमंत्री) देऊ केला होता. प्रफुल्ल पटेल यांचे नावही अंतिम होते. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मांडत त्यांनी हे पद घेण्यास नकार दिला. आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काही निकष निश्चित केले जातात आणि ते निकष एका पक्षासाठी बदलता येत नाहीत. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही. पण भविष्यात पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद नक्की मिळेल असा विश्वास एनसीपीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

'भाजपची ताकद कमी झाली'

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांनी भाजपसाठी आपली उपयुक्तता गमावली आहे. एएनआयशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "जे (अजित पवार) भाजपसोबत जातात त्यांची शक्ती कमी होते. त्यांचा फायदा झाला नाही, असा संदेश भाजपला लोकसभेत द्यायचा आहे. या सगळ्यात सर्वाधिक फायदा प्रफुल्ल पटेल यांना झाला आहे. अजित पवारांसोबत सर्वात हुशार व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल.

कॅबिनेट मंत्रिपदावरून सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळी सर्व पक्षीय खासदार आणि आमदारांची बैठक घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर सायंकाळी सात वाजता सर्व खासदारांसोबत सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. ४ जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९३ जागा मिळाल्या असून भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४