Education System : सरकारी शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब, दिल्ली राज्यांचा आदर्श!
Government education system : सरकारी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्ली आणि पंजाब यांनी देशभरात आदर्श पायंडा पाडला आहे. दिल्लीतील पब्लिक स्कूलच्या मॉडेलची चर्चा फक्त देशातच नाही,तर इतर देशांमध्येही झाली होती.
मुंबई - देशविदेशातील शिक्षणपद्धतीसोबतच भारतातील विविध राज्यांमधील शिक्षणव्यवस्थेतील उत्तम गोष्टी टिपून त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस यांची भेट घेतली. सध्या वैयक्तिक कारणासाठी पंजाबच्या भेटीवर असलेल्या आ. तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. तसंच पंजाबमधील शिक्षणाचं मॉडेल समजून घेत त्यांनी या मॉडेलचं कौतुकही केलं.
ट्रेंडिंग न्यूज
सरकारी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्ली आणि पंजाब यांनी देशभरात आदर्श पायंडा पाडला आहे. दिल्लीतील पब्लिक स्कूलच्या मॉडेलची चर्चा फक्त देशातच नाही, तर इतर देशांमध्येही झाली होती. त्यानंतर अशाच प्रकारचे मॉडेल पंजाबमध्येही राबवण्यात आले. या मॉडेलद्वारे पंजाबमध्ये पालक-शिक्षक बैठकांवर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती मजबूत करण्यासाठी या समितीच्या प्रत्येक बैठकीत शासनाचा एक प्रतिनिधी पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या समितीच्या कामात सुधारणा झाली.
पंजाबमधील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स शिबिरं घेतली जातात. तसंच विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन त्यांना त्या पैशातून एखादा व्यवसाय करण्याचा प्रोजेक्टही दिला जातो. त्यामुळे त्यांच्यातील कल्पकता आणि उद्योजकता वाढीला लागते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या अशा विविध योजना पंजाबमध्ये राबवल्या जात आहे. विशेष म्हणजे १८ पेक्षा जास्त एनजीओ सरकारसह काम करत आहेत. त्यामुळे लोक सहभागाच्या माध्यमातून हे मॉडेल आणखी यशस्वी केले जात आहे.
राज्यातील अनेक सरकारी शाळांची दुरावस्था झाली असून शिक्षणाचा दर्जादेखील खालावत चालला आहे. सरकारी शाळांच्या गुणवत्तेसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याची भूमिका आ. तांबे यांनी सातत्याने मांडली आहे. हाच धागा पुढे नेत आ. तांबे यांनी हरज्योतसिंग बैस यांच्या कडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक मॉडेल राबवण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री बैस यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना दिले. या भेटीतून महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीत पुढील पिढ्यांना उपयुक्त ठरू शकेल अशा अर्थपूर्ण सुधारणांसाठी मार्ग खुला होईल, अशी आशा आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.
विभाग