मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police Attack : मुंबई पोलिसांवर जमावाकडून जीवघेणा हल्ला, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Mumbai Police Attack : मुंबई पोलिसांवर जमावाकडून जीवघेणा हल्ला, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 03, 2023 04:39 PM IST

Mob Attack On Mumbai Police : एका प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर वैजापुरात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Mob Attack On Mumbai Police In Sambhaji Nagar
Mob Attack On Mumbai Police In Sambhaji Nagar (HT_PRINT)

Mob Attack On Mumbai Police In Sambhaji Nagar : मुंबईतील दहिसर पोलिसांच्या टीमवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वैजापुर येथील एका गावात पोलीस भरती घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर ३० ते ३५ आरोपींनी तुफान दगडफेक करत हल्ला केल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून त्यानंतर आता वैजापूर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. मुंबई पोलिसांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अन्य आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पोलीस भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुंबईतील दहिसर पोलिसांचं एक पथक संभाजीनगरातील वैजापुरात दाखल झालं होतं. त्यावेळी आरोपींचा शोध घेतला जात असतानाच अचानक ३० ते ३५ आरोपींनी पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक करत हल्ला चढवला. याशिवाय संबंधित गावातील नागरिकांनी आरडाओरड करत आणखी लोकांना गोळा करत पोलिसांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी आम्ही पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यासाठी आल्याचंही सांगितलं. परंतु तरीदेखील जमावाने त्यांचं ऐकून न घेता पोलिसांना बेदम मारहाण केली आहे.

मुंबई पोलिसांनी वैजापुरातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं, परंतु जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करत दोन्ही आरोपींना घटनास्थळावरून पळवून लावलं. आरोपींनी पोलिसांना मारहाण करत वैजापूर पोलिसांना फोन करून तोतया पोलीस शहरात घुसल्याची तक्रार केली. त्यानंतर दहिसर पोलिसांनी थेट वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं वैजापूर पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point