Mumbai Crime News Marathi : महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहादवरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपसह हिंदुत्ववादी संघटना सातत्याने यावर आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चे काढण्यात येत आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात लव्ह जिहादच्या आरोपावरून एका मुस्लीम तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदू मुलीसोबत फिरत असल्यावर आक्षेप घेत आरोपींनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपींवर कारवाईसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या बाहेर मंगळवारी रात्री उशीरा एक मुस्लिम तरुण हिंदू मुलीसोबत फिरत होता. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुण लव्ह जिहाद करून हिंदू मुलीला फसवत असल्याचा आरोप करत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण केली आहे. टोळक्याच्या मारहाणीत तरुणाला गंभीर मार लागला आहे. माजी आमदार वारीस पठाण यांनी या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला करत आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
वांद्रे स्टेशन बाहेर घडलेल्या या घटनेनंतर आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. तसेच मुस्लीम तरुणाला मारहाण करणारे आरोपी कोण आहेत?, याचाही शोध घेतला जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू केल्याची माहिती आहे. माजी आमदार वारिस पठाण यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळं आता या घटनेवरून राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या