Navneet Rana attack by mob in Daryapur : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोठा गदारोळ झाला. जमावाने या सभेत मोठा राडा घालत नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तानावाचं वातावरण होतं. या घटनेत राणा यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका जोमात सुरू आहे. प्रचार करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी राहिला आहे. त्यामुळे उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी प्रचाराची सांगता होणार असल्याने शनिवारी अमरावती जिल्हयातील दर्यापूर येथील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेत मोठा राडा झाला.
शनिवारी रात्री नवनीत राणा या खल्लार येथे प्रचारसभेसाठी गेल्या होत्या. युवा स्वाभिमानचे उमेदवार अरुण बुंदीले यांचा त्या प्रचार करत होत्या. ही प्रचार सभा सुरू झाली त्याच्या काही वेळाने नवनीत राणा या सभेला संबोधित करण्यासाठी उठल्या. यावेळी काही नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरू केली. तर काही नागरिकांनी गोंधळ घातला. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांनी नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. दरम्यान, गोंधळ थांबत नसल्याने स्वत: नवनीत राणा या त्यांना समजावण्यासाठी जमावाकडे गेल्या. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या. यावेळी काही खुर्च्या या राणा यांच्या बॉडीगार्डला लागल्या. यामुळे या हल्ल्यात त्यांचा बॉडीगार्ड हा किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर नवनीत राणा यांना त्यांची सभा आटोपती घ्यावी लागली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. राणा म्हणाल्या, युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी शनिवारी दर्यापूरच्या खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. सभा शांततेत सुरू असतांना मी भाषण सुरु केल्यावर काही लोकांनी गोंधळ घालला. या जमावाने मला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ देखील केली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून सांगून शांत राहण्यास सांगितले.
मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे मी भाषण संपवल्यावर त्यांची समजूत काढण्यासाठी गेले असता, त्यांनी माझ्या अंगावर खुर्च्या फेकल्या. या प्रकरणी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही तर रविवारी १० नंतर आम्ही अमरावतीत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांनी या घटनेची तक्रार खल्लार पोलिसात दिली. खल्लार पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह ४५ ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना तातडीने अटक न झाल्यास मोठे आंदोलन करून असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहे.