लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीनं समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षही तयारीला लागला आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत ह्या सगळ्या राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे, ते न भूतो भविष्यती असेल, असं ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न हेच आपल्या पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
आपल्या पक्षातील एक-दोन पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाणार आहेत असं मला कळलं. अशा लोकांनी जावं म्हणून मी स्वत: लाल गालिचा घालेन. ज्यांना स्वत:च्या भविष्याचा सत्यानाश करून घ्यायचा असेल त्यांंनी खुशाल जावं. मुळात त्या पक्षांचंच स्थिर नाही तर तुम्हाला काय मिळणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
आपल्या पक्षातीलच चार-चार, पाच-पाच जणांची एक टीम केली आहे. ते राज्यातील जिल्हे व तालुक्यांमध्ये फिरले आहेत. त्यांनी सर्वांशी चर्चा केलीय. त्याचा रिपोर्ट माझ्यापर्यंत आलाय. आता ते पुन्हा जिल्ह्यात जाणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांना योग्य माहिती द्या, असं राज यांनी सांगितलं. ‘निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच तिकीट दिलं जाईल. निवडून आल्यावर मी पैसे खायला मोकळा असा हेतू असणाऱ्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. त्यामुळं आपल्या समितीला प्रामाणिकपणे माहिती द्या. ऑगस्टपासून मी स्वत: राज्याचा दौरा करणार आहे. येत्या निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत मला आपले लोक सत्तेत बसवायचे आहेत,’ असं राज ठाकरे म्हणाले.