Mns worker Died : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीवर अकोल्यात हल्ला करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. जय मालोकार असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर अमोल मिटकरींची कार (amol mitkari car vandalized) फोडण्यात जय मालोकार सहभागी होते.
राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांचाही सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागले. २४ वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालोकर याला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर त्याला तात्काळ अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जय मालोकरच्या अचानक निधनाने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिटकरींच्या कारवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या एकूण १३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी १२ कार्यकर्ते फरार झाले. जय मालोकारही फरार होता. मात्र त्याच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र जमायला लागले. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात तसेच मिटकरींच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
दरम्यान मिटकरी यांनी मृत जय मालोकर यांच्या कुटूंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंनीही मृत कार्यकर्त्याच्या कुटूंबीयांची भेट घ्यावी, असे म्हटले.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पुण्यातील पुरावरून अजित पवारांवर टीका केली होती. त्यावरअमोल मिटकरींनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर मिटकरी आज अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात धडक दिली. मिटकरी थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत मनसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र मिटकरी समर्थक आणि पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. यामुळे चिढलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या मिटकरींच्या कारवर हल्ला करत तोडफोड केली. या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मनसेवर निशाणा साधत त्यांनी मनसेला महायुतीतून लाथ मारून बाहेर काढा, असं आवाहन महायुतीच्यानेत्यांना केलं आहे.
संबंधित बातम्या