Raj Thackeray : माझ्या नादी लागू नका, नाहीतर एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा-mns raj thackeray warning to sharad pawar and uddhav thackeray over maratha reservation ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : माझ्या नादी लागू नका, नाहीतर एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा

Raj Thackeray : माझ्या नादी लागू नका, नाहीतर एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा

Aug 10, 2024 04:08 PM IST

Raj Thackeray on Maratha Reservation : माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत,माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेवशरद पवारांना दिला आहे.

राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा
राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा

उद्धव ठाकरे व शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून राजकरण करत आहेत. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला एकही सभा घेऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरअसून त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे व शरद पवारांना देत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरूच्चारही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यानंतर मी मनोज जरांगे पाटलांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवारांसोबत फोटो आहेत. शुक्रवारी बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार व उद्धव ठाकरे विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा पण माझ्या नादी लागू नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत.

तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर त्यांच्यावर टीका करा पण त्यासाठी समाजात कशाला भांडणं लावण्याचा प्रयत्न करता? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं म्हणतो. मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, आरक्षणाबाबत माझी पहिल्यापासूनच स्पष्ट भूमिका आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही मात्र ते आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे. महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे असून व्यवस्थित चालले तर सर्वांना पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्याव्यात.

शरद पवारांसारखा व्यक्ती मणिपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. राज्यातील तणाव कमी करण्यासाठीशरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच वाद वाढवण्यास हातभार लावत आहेत.

राज्यात नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचे जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्षे आहे. ते स्वाभाविक आहेत. दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर आले. आज माझ्या दौऱ्यात त्यांना व्यत्यय आणला.

महाराष्ट्रात तुम्हाला शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोय का?

राज ठाकरेंनी लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. या अनुषंगाने पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेत तुम्ही लोकसभेला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेसाठी तुम्ही मनसेचे काही उमेदवारी जाहीर करत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात महायुतीतील शिंदे, फडणवीस व अजित पवार नकोय का?, असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंने मिश्कील उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले की, तीन लोकांची एक कंपनी आहे. त्याचांच वाटा ठरलेला नाही, चौथा पार्टनर कुटून घेणार?, असं राज ठाकरे म्हणाले.