मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठवाड्याच्या उरावर रझाकारच नव्हे तर 'सजा'कारही बसलेत, राज ठाकरेंचं पत्र

मराठवाड्याच्या उरावर रझाकारच नव्हे तर 'सजा'कारही बसलेत, राज ठाकरेंचं पत्र

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 17, 2022 11:27 AM IST

Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा सणासारखा साजरा व्हायला हवा, या गौरवशाली लढ्याबद्दल कोणाला फारसं माहिती नसल्याची खंतही राज ठाकरे यांनी पत्रातून व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवस हा संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे असं त्यांनी या पत्रात म्हटलंय.

राज ठाकरे यांनी म्हटलं की, मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती, कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही याबाबत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केलीय. ते म्हणाले की, "मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही."

मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचा इतिहास अभअयासात शिकवायला हवा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये असं राज ठाकरे म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात 'रझाकारांचं' लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजा कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजा कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले की, "माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे."

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग