badlapur news: कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, मनसैनिकांना केलं खास आवाहन-mns raj thackeray got angry over the badlapur school crime ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  badlapur news: कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, मनसैनिकांना केलं खास आवाहन

badlapur news: कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, मनसैनिकांना केलं खास आवाहन

Aug 20, 2024 05:09 PM IST

rajThackeray On Badlapur case : बदलापूरच्या शाळेत लहानग्या मुलींसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोलीस प्रशासनाला फटकारत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा  संताप
बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा  संताप

MNS Raj Thackeray on Badlapur incident : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. जमावाने मंगळवारी सकाळपासूनच शाळेला घेराव घातला असून संतप्त जमावाने बदलापूर स्थानकात रेल्वेही रोखून धरली आहे. रेल रोको आंदोलनामुळे हजारो प्रवासी खोळंबले आहेत. आंदोनकर्ते कुणाचेच ऐकत नसून चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी त्यांच्याकडून होत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज नागरिकांचा उद्रेक झाला असून नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. शाळेत लहानग्या मुलींसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोलीस प्रशासनाला फटकारत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?" असा सवाल करत राज यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.

घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश -

बदलापूर येथील घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.

 

बदलापूर मधील नामांकित शाळेत १२ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत १ ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे यानं लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे लहान मुलींना स्वच्छतागृहात नेण्याची जबाबदारी होती. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.