महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक नेत्यांच्या प्रचार सभांनी धुरळा उडाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनेक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.
भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगत करणं, सर्वकाही करणं शक्य आहे. पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत सध्याच्या राजकारण्यांना स्वारस्य नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली.
राज ठाकरे म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्याकडे पाहिलं पाहिजे. शरद पवार तीनदा मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषी मंत्री झाले. एकदा बारामती तालुक्यात जाऊन पाहा. जेवढे उद्योगधंदे तेथे आहेत, ते मराठवाड्यात आणता आले नसते. विदर्भात आणता आले नसते. इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते…, असं घणाघात राज ठाकरेंनी शरद पवारांवर साधला.
१९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाल्यावर महान संत शरद पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं. प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो, त्यात वावगं काही नाही, मात्र दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या. तुमची माथी भडकावली. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. असं म्हणत तरूणांच्या प्रश्नांकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.
राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. आधी म्हणतात निवडणूक लढवणार. नंतर म्हणतात लढणार नाही, पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही.
मी जेव्हा जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर हा विषय टेक्निकल तसेच किचकट असल्याचे सांगितले होते. यासाठी लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्या जाहीरनाम्यात तेवढ्याच गोष्टी टाकणार आहे. टाकलेल्या आहेत जेवढ्या मला करणे शक्य होणार आहे. त्यातील एक गोष्ट सांगतो. प्रत्येक मराठी मुलींना आणि मुलांना १०० टक्के रोजगार या महाराष्ट्रातच मिळेल. खासगी कंपन्यात आरक्षण नाही. मी शब्द देतो. या खासगी कंपन्यातही आरक्षणाविना राज्यातील मराठी मुला मुलींना नोकऱ्या मिळतील. उद्योगधंदा करायचा असेल तर राज्यातील मुलं मुली घ्यावी लागतील. त्यांच्या हाताला काम मिळाल्यावर नोकऱ्या मिळाल्या तर बाहेरची बोलावू. माझ्या राज्यातील मुलं उपाशी राहत असतील तर मला ते चालणार नाही,असं राज ठाकरे म्हणाले.