मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray News : राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले! पुण्यातील बैठक रद्द करून तडकाफडकी मुंबईला रवाना; नेमकं काय घडलं?

Raj Thackeray News : राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले! पुण्यातील बैठक रद्द करून तडकाफडकी मुंबईला रवाना; नेमकं काय घडलं?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2024 07:10 PM IST

Raj Thackeray Pune News : पुण्यात आयोजित विभाग प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी राज ठाकरे आज पुण्यात आले होते. मात्र बैठकीला कोणीही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे संतापून तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले.

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले
राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात आले होते. मात्र पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि  प्रमुख कार्यकर्ते वेळेवर उपस्थित न झाल्याने राज ठाकरें चांगलेच संतापले. रागाच्या भरात राज ठाकरे बैठकच रद्द करून पुण्यातून तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले. या घटनेची पुण्याच दिवसभर चर्चा सुरू होती. राज ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नवी पेठेतील पक्ष कार्यालयात बैठकीच्या वेळेपर्यंत कोणीच न आल्याने राज ठाकरे निघून गेले. ही बैठक सकाळी ११ वाजता बोलावली होती. नंतर यामध्ये बदल करत बैठकीची वेळ दुपारी २ वाजताची करण्यात आली. यासाठी पदाधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. राज ठाकरेदेखील सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले होते. मात्र या वेळेपर्यंत मुख्य पदाधिकारी तसेच विभागप्रमुखही कार्यालयात उपस्थित नव्हते. पुणे मनसेसाठी ही बैठक महत्वपूर्ण होती. मात्र कोणीच पदाधिकारी नसल्याने सव्वा तीन वाजता राज ठाकरे अचानक बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीसोबतच आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार होते. मात्र राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.  दरम्यान, यामुळे पुण्यातील मनसेमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

WhatsApp channel