Arya Gold recruitment Advertisement: आर्या गोल्ड कंपनीच्या नोकरीच्या जाहिरातीने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कंपनीने इंडीड जॉब पोर्टल बेवसाईटवर दिलेल्या जाहिरातीमध्ये मराठी माणूस नकोय, असे स्पष्ट सांगितले. ही माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी अंधेरीतील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीत पोहोचले आणि मालकाचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर कंपनीच्या मालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामाचे पत्र दिले.या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
'काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होणारी आर्या गोल्ड (अंधेरी) मधील कंपनीला मधील जाहिरातीला मनसे दणका देताच कंपनीच्या मालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामाचे पत्र दिले.मराठी बाणा मराठी स्वाभिमान मराठी अस्मितेला डाग लावला तर राजसाहेबाचे महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, असा आशयाची @Rajpremi_ या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मरोळ एमआयडीसीमध्ये असलेल्या आर्य गोल्ड कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर पदासाठी भरतीची जाहिरात करण्यात आली. मात्र, या जाहिरातीमध्ये मराठी माणूस नकोय, असे नमूद करण्यात आले. त्यानंतर मनसेचे लोक कंपनीत पोहोचले आणि त्यांनी मालकाला लेखी माफी मागायला लावली.
काही दिवसांपूर्वी लिंक्डइनवर अशाच पद्धतीने नोकरीची जाहिरात देण्यात आली होती. यानंतरही बराच वाद झाला. त्यावेळीही मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतली. मनसेने संबंधित कंपनीकडूनही माफीनामा घेतला. या वादानंतर आणि अशा जाहिरातींनंतर सोशल मीडियावर लोक कंपनीविरोधात संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
'जमीन, वाहतूक, इलेक्ट्रिसिटी, कच्चा माल सगळे काही मुंबई महाराष्ट्रातले चालेल. मग चालणार नाही तो फक्त महाराष्ट्रातला मराठी माणूस, आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत अमराठी ही प्रमुख अट घातली आहे. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातची मुनिमगीरी करण्यासाठी आहे?' असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या