मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS Vs Shivsena: राज ठाकरेंनी भावालासुद्धा सोडलं नव्हतं, सामनाने चिंता करू नये; मनसेचं उत्तर

MNS Vs Shivsena: राज ठाकरेंनी भावालासुद्धा सोडलं नव्हतं, सामनाने चिंता करू नये; मनसेचं उत्तर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 15, 2022 02:07 PM IST

MNS Vs Shivsena: शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. याला आता मनसेने उत्तर दिलं असून शिवसेनेचं आंदोलन म्हणजे नाटक असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी भावालासुद्धा सोडलं नव्हतं, सामनाने चिंता करू नये; मनसेचं उत्तर
राज ठाकरेंनी भावालासुद्धा सोडलं नव्हतं, सामनाने चिंता करू नये; मनसेचं उत्तर (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

MNS Vs Shivsena: वेदांता प्रकरणावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरूनही टीका केली होती. तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे हे मित्र भाजपवालेच आहेत असं शिवसेनेनं म्हटलं होतं. आता या टीकेला मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं चिंता व्यक्त केली होती. शिवसेनेनं राज ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं की, "राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली हे बरं झालं, पण राज्यावर आर्थिक हल्ला करणारे आणि तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. राज्याच्या प्रगतीची सर्व इंजिन, डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका लक्षात घ्यायला हवा."

शिवसेनेनं डिवचल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या भल्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा राजसाहेबांना मित्रांनाच काय पण भावालासुद्धा सोडलं नाही, त्यामुळे सामनाने त्याची चिंता करू नये असं थेट उत्तर संदीप देशपांडे यांनी दिलं.

शिवसेनेनं वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानतंर केलेलं आंदोलन म्हणजे नाटक असल्याचं मनसेनं म्हटलं. मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावून घेत होते आणि मनसे महाराष्ट्रात आंदोलन करत होती, राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प होती असंही संदीप देशपांडे म्हणाले.

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हा जवळपास १ लाख ५८ हजार कोटींचा होता. सेमीकंडक्टर चीप बनवण्याच्या या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे मिळून एक लाखाहून जास्त रोजगार निर्माण होणार होते. पुण्यातील तळेगाव इथं या प्रकल्पासाठी जागाही मंजूर करण्यात आली होती. मात्र तरीही हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आता राजकीय वातावरण तापलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या