मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS vs Shiv Sena : ‘शिवसेना पवारांच्या पिंजऱ्यातली...’, मनसेची ठाकरेंवर बोचरी टीका
MNS vs Shiv Sena
MNS vs Shiv Sena (HT)

MNS vs Shiv Sena : ‘शिवसेना पवारांच्या पिंजऱ्यातली...’, मनसेची ठाकरेंवर बोचरी टीका

21 September 2022, 11:12 ISTAtik Sikandar Shaikh

MNS vs Shiv Sena : दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडे विचार तरी राहिले आहेत का?, असा सवाल करत मनसेनं ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

MNS vs Shiv Sena : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गटप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. दादरमधील शिवाजी पार्कवर शिवसेना दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. परंतु आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षात आता मनसेनंही उडी घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेवर टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातील मांजर झाली आहे, दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडे विचार तरी उरले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे.

मनसे ही भाजपची दुसरी शाखा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना देशपांडे म्हणाले की, संभाजीनगरमधील हे सगळे नेत असेच आहेत, दानवे असो की खैरे, त्यांचं नेत्तृत्व आऊटडेटेड झालेलं असल्याची टीका देशपांडेंनी केली आहे. राष्ट्रवादी वाढतेय, शिवसेना संपतेय, हे ग्रामपंचायतीच्या निकालांतून दिसून आलं, आता जयंत पाटलांनी यावर उत्तर द्यावं, असं म्हणत त्यांनी राष्ट्रावादीलाही टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष...

दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यावरून वाद पेटलेला आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेला मेळाव्यासाठी कोणतं मैदान मिळणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता शिवसेनेनं दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे.