Raju Patil attacks Eknath Shinde : माहीम विधानसभा मतदारसंघावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांनी उमेदवार दिल्यामुळं व तो लढण्यावर ठाम असल्यामुळं मनसेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी वाट मोकळी करून दिली आहे.
राजू पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे या पितापुत्रांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मला या बाप-बेट्यांची दानत चांगली माहीत आहे. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार, अशी जळजळीत टीका राजू पाटील यांनी केली आहे.
‘मला इथली स्थानिक परिस्थिती चांगली माहिती आहे. गेल्या ५ वर्षात या लोकांनी मला खूप त्रास दिलाय किंवा मी त्यांना क्रॉस केलेलं आहे. तो वचपा काढण्यासाठी, सूडभावनेनं त्यांनी इथं उमेदवार दिला आहे’, असं राजू पाटील म्हणाले.
कल्याण ग्रामीण मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. इथं मनसेचे विद्यमान आमदार राजू (प्रमोद) पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीनं त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिंदे गटानंही इथून राजेश मोरे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं राजू पाटील भडकले आहेत. या तीन प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार कल्याण ग्रामीणमधून रिंगणात आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता चित्र स्पष्ट होणार असून उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
संबंधित बातम्या