Exit Poll results 2024 : एक हाती सत्ता द्या असं आवाहन करण्यापासून ते आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला निवडणुकीत किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता आहे. मतदानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज मनसेची निराशा करणारे आहेत.
निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर बुधवारी, २० नोव्हेंबरला एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या जागांची आकडेवारी देण्यात आली आहे. ही आकडेवारी म्हणजे केवळ अंदाज असतात. प्रत्यक्ष निकाल तसा लागतोच असं नाही. मात्र, याविषयी राजकीय पक्षांना व त्यांच्या समर्थकांना प्रचंड उत्सुकता असते.
एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीची एकूण आकडेवारी देण्यात आली आहे. तसंच, या आघाड्यांमधील प्रमुख पक्षांच्या स्वतंत्र जागाही दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, आघाडी व युतीपासून दूर राहून स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढणाऱ्या मनसे व वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्रपणे दखलही घेण्यात आलेली नाही. सर्वच एक्झिट पोल्सनी मनसे व वंचित बहुजन आघाडीला ‘इतर’मध्ये ढकललं आहे.
मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व अपक्षांसह इतर छोट्या पक्षांना २० च्या जवळपास जागा मिळतील असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे. त्यातील प्रत्येक पक्षाची स्वतंत्र आकडेवारी देण्यात आलेली नाही. 'दैनिक भास्कर'च्या पोलनं मनसेला केवळ २ ते ४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. 'इलेक्ट्रोल एज'च्या एक्झिट पोलनं इतरांना २० जागा मिळतील असा मोघम निष्कर्ष काढला आहे. 'चाणक्य'नं मनसे आणि वंचितला एकत्रितपणे ६ ते ८ जागा मिळतील असं म्हटलं आहे.
एक्झिट पोल ही शेवटी पाहणी असते. तो प्रत्यक्ष निकाल नसतो. त्यामुळं हे पोल बरोबरच येतातच असं नाही. अनेकदा एक्झिट पोलच्या नेमके विरुद्ध निकाल लागल्याचा इतिहास आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी निकालापर्यंत वाट पाहणं पसंत केलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत १३८ उमेदवार उतरवले होते. त्यांनी राज्यभर प्रचारसभाही घेतल्या. त्यामुळं त्यांचे समर्थक आशावादी आहेत.