Maharashtra Election results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर सर्वच विरोधी पक्षाचे नेते ईव्हीएम व निवडणूक प्रक्रिया रावबण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेऊ लागले आहेत. मनसेच्या पराभूत उमेदवारांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीवही निवडणूक जिंकू शकले नाहीत. अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. या पार्श्वभूमीवर पराभवाचं चिंतन-विश्लेषण करण्यासाठी राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती.
मनसेच्या उमेदवारांना नेमक्या काय अडचणी आल्या? वातावरण चांगलं असूनही मतं का मिळाली नाहीत? याची माहिती राज ठाकरे यांनी घेतली. तर, बहुतेक उमेदवारांनी पराभवासाठी मतदानयंत्राला (EVM) दोष दिला. सत्ताधारी उमेदवारांकडून पैशाचा प्रचंड वापर करण्यात आला. त्यांच्या धनशक्तीपुढं आम्ही टिकूच शकलो नाही अशी कैफियत काही उमेदवारांनी मांडली.
सर्व उमेदवारांच्या भावना जाणून घेतल्यावर राज ठाकरे यांनी पदाधिकारी व उमेदवारांना काही सूचना केल्या. आपापल्या मतदारसंघात झालेल्या घोळाचे पुरावे गोळा करा आणि तुमच्या तक्रारी लेखी स्वरूपात द्या, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसेचे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुणकर यांनीही ईव्हीएमचे घोळ, निवडणूक अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आधीच संताप व्यक्त केला आहे. येरुणकर हे ज्या वॉर्डमध्ये राहत होते. तिथं त्यांना केवळ दोन मतं मिळाली आहेत. घरातच चार मतदार असताना दोन मतं कशी मिळू शकतात? माझी आई, पत्नी, मुलगीनंही मला मत दिलं नाही असं समजायचं का?,' असा सवाल त्यांनी केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.