Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सेनेविरोधात भाजप व राज ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं शिंदे यांच्या बहुतेक उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यामुळं ही चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये आहेत. तर, मनसे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर संपूर्ण राज्यातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. मनसेनं मुंबईतील ३६ पैकी २५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
महायुतीकडून मुंबईत भाजप १०, तर शिवसेना १२ जागांवर निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. मनसेनं राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विनोद शेलार, मिहीर कोटेचा, तमिळ सेल्वन यांना वॉकओव्हर दिला आहे. हे सर्व जण फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
दुसरीकडं एकनाथ शिंदे सेना ज्या जागांवर निवडणूक लढवत आहे, त्या सर्व जागांवर राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले आहेत. यात वरळी, सदा सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, दिलीप लांडे, संजय निरुपम, मनीषा वायकर, अशोक पाटील, सुवर्णा राज, प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिले आहेत.
विशेष राज ठाकरे यांनी शायना एनसी यांच्याविरोधात उमेदवार उभा केलेला नाही. त्या मुंबादेवी मतदारसंघातून लढत आहेत. शायना एनसी या शिंदेंच्या पक्षाकडून लढत असल्या तरी मूळच्या भाजपच्या आहेत. मनसेनं मुरजी पटेल यांच्याविरोधात देखील उमेदवार दिलेला नाही. ते देखील शिंदेंच्या सेनेकडून निवडणूक लढवत आहेत, मात्र मूळचे भाजपचे आहेत. हे कारण यामागे असावं असं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र कमी जागा लढवूनही आपण ७ जागा जिंकल्या असं शिंदे व त्यांच्या पक्षाचे लोक सांगत होते. त्यामुळं विधानसभेतील जागावाटपात त्यांनी बरंच ताणून धरलं होतं. शिंदे यांच्या पक्षाला मुंबई व ठाण्यात चांगला पाठिंबा आहे. या जागांवर त्यांचा पराभव झाला तर महायुतीमध्ये त्यांची उंची कमी होणार आहे. ते करण्यासाठीच भाजप मनसेची मदत घेतोय का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भाजपशी पूर्ण चर्चा करूनच मनसे निवडणुकीत उतरली असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे हे आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लक्ष्य करत असल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे.