मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : …मग हेच औदार्य दाखवत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

Raj Thackeray : …मग हेच औदार्य दाखवत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

Feb 09, 2024 06:15 PM IST

Rai Thackeray On Bharat Ratna : केंद्र सरकारने इतरांना दाखवलेलं औदार्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

Rai Thackeray On Bharat Ratna
Rai Thackeray On Bharat Ratna

लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केल्यानंतर मोदी सरकारकडून आज माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह,पी. व्ही. नरसिंह राव तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरकारने इतरांना दाखवेलं औदार्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत केली आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतले एस. स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.

तसेच बाकी पी. व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

शिवसेनेकडून स्वातंत्र्यवीर सावरकारांना भारतरत्न देण्याची वारंवार मागणी होत असताना आता राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी बाळासाहेब ठाकरेंचे नाव पुढे करण्यात आले आहे. यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४