Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’वर राज ठाकरे यांची टीका; म्हणाले, लाडका मतदार…-mns chief raj thackeray criticize mukhyamantri ladki bahin yojana ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’वर राज ठाकरे यांची टीका; म्हणाले, लाडका मतदार…

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’वर राज ठाकरे यांची टीका; म्हणाले, लाडका मतदार…

Aug 16, 2024 09:03 AM IST

राज्य सरकारने जाहीर केेलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली.

लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका

राज्य सरकारच्या बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे सोमवारी सकाळी सोलापुरात दाखल झाले. ठाकरे आज सोलापुरात मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे. जिल्ह्यात तिकीट वाटपासंदर्भात ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढणार असून एकूण २८८ मतदारसंघापैकी २२५ ते २५० जागांवर मनसे उमेदवार उभे करणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीपुरता पाठिंबा दिला होता. विधानसभेत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं ते म्हणाले. विरोधकांच्या सर्व प्रकारच्या टीकेला आगामी काळात आपण उत्तर देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘माझा लाडका मतदार’ योजनाही सुरू कराः राज यांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षीच्या बजेटमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजद्वारे पात्र महिलांना राज्य सरकारकडून महिन्याला १५०० रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. या योजनेबाबत आज राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ..’ योजना अशा प्रकारच्या योजना आणण्यापेक्षा सरकारने थेट माझा लाडका मतदार योजना जाहीर करून टाकण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. अशी योजना जाहीर केल्यास थेट सगळ्यांना पैसे वाटण्याचा मार्ग मोकळा होईल. बाकी दुसरी काही भानगडच नको, असं राज ठाकरे म्हणाले.

‘खेलो इंडिया’साठी केंद्राचा सर्वाधिक क्रीडा विकास निधी गुजरातला का?

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणारा ‘खेलो इंडिया’चा सर्वाधिक निधी यंदा गुजरातला मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशातील सर्व राज्यांना समान निधी वाटायला हवा होता. यापूर्वी मी अनेकदा ही मागणी केली होती, असं राज म्हणाले.

बाहेरून आलेल्या लोकांची व्यवस्था करण्यातच राज्य सरकारचा पैसा खर्च होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. परिणामी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना राबवता येत नाही, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना खरंतर आरक्षणाची गरजच नाही. नोकरीमध्ये महाराष्ट्रातील मुला-मुलींना प्राधान्य द्यावा. नोकऱ्या उरल्या तर बाहेरच्या राज्यातील तरुणांना बोलवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.