वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना आवाहन

वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना आवाहन

Published Oct 12, 2024 11:30 AM IST

Raj Thackeray Podcast : राज्यातील दसरा मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सत्ताधारी व विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना लक्ष्य केलं.

वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा - राज ठाकरे
वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा - राज ठाकरे

Raj Thackeray Podcast : ‘शमीच्या झाडावरची शस्त्रं योग्य वेळी काढायची असतात. पण आपण ऐनवेळी मतदानाचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवतो आणि नंतर तक्रारी करत राहतो. यावेळी असं करू नका. बेसावध राहू नका. वचपा काढण्याची वेळ आलीय. शमीच्या झाडावरची शस्त्र बाहेर काढा आणि तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांचा वेध घ्या,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं.

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी प्रथमच पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. 'दसरा म्हटलं की आपण एकमेकांना सोनं वाटतो, लुटतो. महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्षे लुटलं जातंय. पण आपण आपट्याची पानं वाटतोय. लुटणारे लुटून गेले. आपल्या हातात पानं सोडून काही राहत नाही. कारण आमचं लक्ष नाही. आम्ही कधी जातीपातीत, कधी स्वत:च्या आयुष्यात मश्गुल राहतो आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात, अशी खंत राज यांनी व्यक्त केली.

रस्ते, पूल म्हणजे प्रगती नाही!

‘महाराष्ट्राची प्रगती नेमकी कुठं होतेय, असा सवाल करून राज ठाकरे म्हणाले, 'रस्ते, पूल म्हणजे प्रगती नाही. मोबाईल, कलर टीव्ही आला म्हणून प्रगती नाही. अजूनही आपण चाचपडत आहोत. इतकी वर्षे प्रगतीच्या थापा ऐकूनही तुम्हाला राग येत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता. पश्चात्तापाचा हात कपाळी मारून घेता, पाच वर्षे बोंब मारायची पण ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही मतदानाचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवता. निवडणुका संपल्या की बाहेर काढता, असा त्रागा राज यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या!

'आज तुम्हाला संधी आलीय. आतापर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली. या निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सांभाळलं, जोपासलं त्यांनी तुम्हाला गृहित धरलं. वेड्यावाकड्या युत्या आणि आघाड्या केल्या. तुमच्या मताशी प्रतारणा केली. त्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालं. आता वचपा घेण्याची वेळ आहे. तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, अपमान केला. ज्यांनी गृहित धरलं. त्यांचा वेध घ्या, शमीच्या झाडावरची शस्त्रं उतरवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय, ती संधी मिळावी, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर