मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS with Eknath Shinde: मुंबईत वेगळंच 'राज'कारण; मनसेची भाजपशी नव्हे, शिंदे गटाशी युती होणार?

MNS with Eknath Shinde: मुंबईत वेगळंच 'राज'कारण; मनसेची भाजपशी नव्हे, शिंदे गटाशी युती होणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 06, 2022 05:55 PM IST

MNS and Eknath Shinde Camp Alliance: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि एकनाथ शिंदे गटाची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Raj Thackeray - Eknath Shinde
Raj Thackeray - Eknath Shinde

Raj Thackeray with Eknath Shinde: शिवसेनेत उभी फूट पाडण्यात यशस्वी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला दुसरा दणका देण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेशी शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा बंद दाराआड सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं शिवसेनेत बंड घडवून आणून राज्याती सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यानंतर भाजपचं लक्ष्य मुंबई महापालिका हे आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून घ्यायची अशी भाजपची रणनीती आहे. त्या दिशेनं पावलं टाकण्यास भाजपनं सुरुवात केली आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना जागा दाखवण्याची थेट भाषा केली आहे. तसंच, १५० नगरसेवकांचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यावरून भाजपच्या आक्रमकतेचा अंदाज सर्वांनाच आला आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप एकनाथ शिंदे गटाच्या मदतीनं मुंबईतील निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं असलं तरी एवढ्यावरच शिवसेनेला निर्विवाद मात देता येईल का, याबाबत भाजपला शंका आहे. त्यामुळंच मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेनं अलीकडं हिंदुत्वाचा राग आळवला असला तरी त्यांच्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेमुळं त्यांना थेट सोबत घेण्यात भाजपला अडचण वाटत आहे. त्यामुळंच मनसेनं शिंदे गटाशी हातमिळवणी करावी, अशी रणनीती असल्याचं सांगितलं जातं. 

'आम्हीच शिवसेना' असा दावा एकनाथ शिंदे गटानं किती केला तरी ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण लोकांच्या मनातून पुसणं कठीण आहे. 'ठाकरे' ब्रँडची ही त्रुटी राज ठाकरे यांना सोबत घेऊन भरून काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. मनसे विषयीच्या युतीबद्दल अद्याप कुणीही थेट काहीही बोलत नसले तरी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असल्याचं दिसतं. गणपती विसर्जनानंतर खऱ्या अर्थानं घडामोडींना वेग येणार असून तेव्हाच मुंबईतील नवं 'राज'कारण समोर येईल, असं बोललं जात आहे.

अलीकडंच गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. याशिवाय, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही राज ठाकरे हजेरी लावणार असल्याचं कळतं. त्यामुळं नव्या समीकरणांच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

WhatsApp channel