पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वीच मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्गे जोडणाऱ्या अटल सेतूचे उद्घाटन केले होते. मात्र या सेतूला लोकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्या येत असताना आता या अटल सेतूला तडे गेल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज थेट अटल सेतूवर जाऊन रस्त्याची दुरवस्था दाखवली. याचे काही फोटो शेअर करत त्यांनी रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्याचा आरोप केला. यावर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने स्पष्टीकरण दिलं आहे.
एमएमआरडीएने म्हटले की, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या सेवा मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा सेवा मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा पोहोच रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत देण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जून २०२४ रोजी केलेल्या तपासणी दरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काँग्रेसच्या टीकेवर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अटल सेतूला कोणताही तडा गेलेला नाही, तसेच अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र जवळच्या रस्त्याचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेसने खोट्याचा आधार घेऊन एक लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक आणि आता अशा खोट्या अफवा. मात्र, देशातील जनताच या ‘तडा’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप करत काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर अटल सेतू प्रकल्पाचे प्रमुख कैलाश गणतारा यांनी उत्तर दिले की, हा सर्व्हिस रोड आहे. हा रोड अटल सेतूच्या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. हे तडे अटल सेतूला गेलेले नाहीत. मात्र ,तडे गेल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या